Alternate Text

|| यशवंत हो, जयवंत हो ||

१९२३ चा जून महिना होता. दिनांक सुध्दा २३ होती. योगी प्रहराने कळस गाठायला सुरुवात केली होती. भगव्या रंगाने नभांगण उजळून निघाले होते .अशा श्रीराम प्रहरी लक्ष्मण नामक बालकाने सगुणा मातेच्या पोटी नावजी मानेंच्या घरात जन्म घेतला. बाळाच्या स्वागताला मेघदेवता सरसावली. मायणीच्या भूमीवर जलदेवतेने अभिषेक घातला. या तेजःपुंज बालकाचे दर्शन घेण्यास आतुर झालेल्या सुर्यदेवतेने आपल्या सहस्त्राकीरनांनी जन्मोस्तवाचे स्वागत केले. भविष्यातील दारिद्रीनारायनाचे, नवकोट नारायणाचे दर्शन घेऊन सुर्यनारायण सुद्धा तृप्त झाले.

Yashwant Baba जेवल्यानंतर आईच्या पदराला तोंड पुसणाऱ्या बालकाची आई बालपणीच देवाघरी गेली.बालपण कोरडे - शुष्क झाले. आईचा पदर नाहीसा झाल्यावर मौल्यवान चादरही नकोशी झाली. उदास जीव सिद्धेश्वर कुरोली येथील मोठ्या बहिणीच्या पंखाखाली विसावण्याचे निमित्त करून आला. सिद्धेश्वराच्या शिवमंदिरातील शिवनाद ऐकून सहज शिवमय झाला. जीव-शिव एकरूप झाला.

या दिव्यत्वाचा लपा - छुपीचा खेळ कुरोलीपासून दूर खेळण्यासाठी भ्रमंती पसंत केली . ते मुंबईला गेले मुंबादेवीने त्यांचे स्वागत केले खरे पण या भोळ्या सांभाला स्मशान शांतता प्रिय वाटे. तेथून बाबा सोमेश्वरला आले. तासन - तास समाधिस्थ होऊ लागले . सोमेश्वरला साध्या वेष्यातील ध्यानमग्न शिव पाहून समाधान वाटले . पुढे वालचंदनगर करून मध्यप्रदेश गाठले. इंदूरहून ते दिल्लीला पोहचले . देशाची सूत्रे हलविणाऱ्या राजधानीत भविष्यातील आपल्या कार्याचा अदृष्य टॉवर इथे उभारला. पुढे पाकिस्तानमधील कराचीत विसावले. कराचीत इस्लाम बांधवांचे कर या मधुकराला जोडले गेले. पुन्हा भारतात आगमन झाल्यावर काशी विश्वेश्वराकडे धावले. प्रयाग, गया हि पवित्र तीर्थस्थळे बाबांच्या चरणांनी अधिक पावन झाली. ज्यांच्या चरणी रिद्धी - सिद्धी लोळण घेत असे श्री चरण पुण्याच्या मुळा - मुठा नदीतीरी धावले. विद्देचे माहेर घर पुणे यशवंत झाले.पुन्हा पाऊले देहू आळंदीकडे वळली. तुकोबांची गाथा सुलभ होऊन त्यांच्या माथ्यावर विराजमान झाली. ज्ञानदेवांची ज्ञानेश्वरी सोपी होऊन त्यांच्या जिव्हेवर स्वार झाली. खंडेरायाच्या जेजूरीचे प्रयाण म्हणजे पिवळ्या धमक भंडाऱ्याने दिलेल्या महात्यागाचे संकेत ठरले. बाबांचे चरण पुन्हा औंधला वळाले. . . आदिशक्ती श्री यमाई देवीचे अंतःकरण शिव अवतार पाहून द्रवले असेल. तेथून ते औंधच्या खिंडीतील जुन्या गणेश मंदिरात थांबले. पुन्हा बाबा कुरोलीत आले ते दिव्यत्वाचा श्री गणेशा करण्यासाठीच !

भ्रमंतीत बाबांनी भारताचे नग्नरुप पाहिले . तीस कोटीच्या आत लोकसंख्या असूनही अन्न, वस्त्र, निवाऱ्याला महाग झालेली जनता पहिली. अज्ञान, अंध:श्रद्धा, जातीभेद , धर्मभेद इ. विषवल्लरी पाहिली. बुद्ध, महावीर, जीझस , पैगंबर, गुरुनानक यांनी विश्वाला कसे तारले हे ही पाहिले. हे मानवतेचे दिपस्तंभ त्यांनी न्याहाळले. हे विश्वची माझे घर हे बाबांचे ब्रीद झाले

कुरोलीत बाबा नगारखाना, चिवटे, सबनिस, गोसावी, गरवारे यांच्या वाड्याच्या परिसरात रहात. पाच घरी माधुकरी मागत. हातात काठी व खांद्याला सर्वधर्मसमभावाची झोळी होती. बाबांनी जीवांच्या उद्धारासाठी माधुकरी मागणे पसंत केले. कुबेराच्या धनाच्या किल्ल्या कमरेला असूनही देव भक्तांच्या कल्याणासाठी भिक्षूक झाला. मांग, महार, कुंभार, लोहार, जैन, मुसलमान यांची भिक्षा स्विकारी. मिळालेल्या माधुकरीचे तीन भाग करत. एक श्वानाला दुसरा माशाला व उरला तो स्वतःला त्रिखंडाचा स्वामी अमृताचा त्याग करून वाळलेला भाकरीचा तुकडा भिजवून घशात ठेवत. वेदावती नदीच्या काठावर भगवंताच्या माधुकरीची वाटणी पाहून वेदावातीच्या डोळ्यातून अश्रु घळघळले असतील.

हे दिव्यत्य स्वयंभू होते. ते निसर्गाचे वरदान होते. शिवशंभूचे स्वयंभूत्व लपविण्यासाठी चिंध्याधारी झाले. मग कुणाची भांडी घासणे, पोस्टात पत्रे टाकणे, झाडलोट करणे, सारवणे अशा प्रकारची कामे करू लागले . झोपायला पोते, अंगावर पोते, नेसायला पोते, डोक्यावर पोते. हे पोतेच त्यांचे अजरामर आसन ठरले. डोक्यावर झिंज्या अंगावर चिंध्या असा अवतार करूनही सर्वांना बाबाचा सहवास प्रिय,अपूर्व वाटे. बोलण्यात आणि कृतीत गुढता असे. सहजा - सहजी उकल होत नसे . सिंहाने गुहेतून डरकाळी फोडल्याप्रमाणे आवाजात प्रचंड धार होती . त्यांचे वसने, हसणे, बसने, बोलणे, बिडी ओढणे सगळेच ठळक वाटे. आगळे- वेगळे वाटे. त्यांच्याकडे बघत - बघतच बघणाराचे हात आपोआप जोडले जात. त्यांचा केवळ दर्शनानेही लोकांची अडलेली कामे विनासायास पार पडत. या अवस्थेत बाबा स्मशानभूमीच्या परिसरात, एकांतात, वृक्षवल्लरीच्या, पशु-पक्ष्यांच्या सहवासात असत.

चहात पाणी ओतून चहा घेत ,शेव मध्ये खडीसाखर मिसळत ,भजी ग्लासभर पाण्यात भिजवून पिळून खात. ज्या जागेत विषारी नागांच सुळसुळाट असे तेथेच झोपणे पसंद करत कोण म्हणे बाबा वेडे आहेत. कोण म्हणे अवालिय आहेत. कोण म्हणे ते असामान्य ,अलौकीक सामर्थ्यशाली आहेत. बाबा कोण असावेत असा प्रश्न पडला नाही असा तेथे माणूस शोधुनही सापडणार नाही.

सुर्य तेजाला गोणपाटात किती दिवस झाकायचे असा प्रश्न देवदेवतांना पडला असावा. श्री गजानन महाराज शेगांवकर यांना राहवले नाहीं. न भूतो न भविष्यातो अशी शेगावहून भव्य पायी दिंडी कुरोलीला आली. सिध्देश्वराच्या विशाल,पवित्र परिसरात मुक्काम केला. दिंडी कुरोलीहून निघण्याचा व कुरोलीच्या यात्रेचा दिवस एकाच होता. त्यामुळे मुगंयाप्रमाणे माणसे होती. सर्वसाधारण दहा हजार लोकांचा विराट जनसमुदाय जमला होता. साखर विस्कटल्याप्रमाणे माणसेच माणसे होती.

दिंडीच्या नित्य प्रथेनुसार भला मोठा पुष्पहार हत्तीच्या सोंडेत दिला. हत्ती संथ गतीने गर्दीतून वाकडी वाट करून पुढे सरसावू लागला. माहुताला हत्तीला रोखणे अवघड झाले. बाबा स्टॅंडच्या दगडी कठड्यावर एखाद्या महाराजाप्रमाणे ऐटीत बसले होते. गजराज गजगतीने बाबांच्या पुढ्यात आला. सोंडेतील पुष्पहार बाबांच्या गळ्यात घातला.पुढचे गुडघे टेकवले व नतमस्तक झाला. सोंडेने श्री चरणांना विळखा घातला. उठून प्रणाम केला.

सर्व जनसमुदाय आवाक झाला. डोळयांचे पारणे फिटले. ढगांचा गडगडाट आणि विजांचा कडकडाट व्हावा तसा टाळ्यांचाही कडकडाट झाला. सर्व आसमंत बाबांच्या जयघोषाने दुमदुमला. सर्वांनी बाबांना हात जोडून प्रणाम केला.

यावर श्री महाराज गजराजास उद्गारले- " का रे बाबा, आम्ही इतक्या दिवस झाकून ठेवलेले क्षणार्धात उघडे केलेस. "

धूप अगरबत्तीचा सुगंध जसा दरवळावा तशी ही गोड बातमी सर्वदुर पसरली. बाबा हे चिंध्याधारी देह धारण करणारे भगवंत आहेत हे लोकांनी जाणले. कार्तिक पौर्णिमा हा बाबांचा प्रकट दिन झाला. गजराजाने हार घातला ती वेळ दिवसा बारा वाजता होती . या प्रकटदिनी बारा वाजता संजिवन समाधी स्थळावर पुष्पवृष्टी व दीपोत्सव साजरा केला जातो.

ज्या दिवशी हा प्रसंग घडला तो दिवस कार्तिक पौर्णिमेचा ( त्रिपुरारी पौर्णिमा ) होता . यात्रेच्या दिवशी सिद्धेश्वर मंदिरात दिपोत्सव होता . सायंकाळी दीप माळेतील सर्व दिवे प्रज्ज्वलित केले होते . या दिवशी भगवान शंकराला प्रसन्न करण्यासाठी दिवेच दिवे लावतात. त्यामुळे कुरोलीच्या घराघरात अंगणातही दीपोत्सव साजरा केला जातो. श्री महाराजांचे प्रकटीकरण व दिव्यांचा लखलखाट पाहून सिद्धेश्वराला समाधान वाटले असेल.

श्री. म च्या कर्मयोगाचा चंद्रमा कलेकलेने वाढू लागला. कालांतराने सर्व भक्तगण या भालचंद्रास ' शिव - शक्ती ' म्हणून बाबांच्याकडे पाहु लागले.

श्री. म हळूहळू गावातून बाहेर पडले. वेदावातीच्या काठावर अथवा स्मशान भूमीच्या परिसरात त्यांचा निवांत निवास असे. दगड - धोंड्यात झोपायचे. उशाला वारूळ असायचे. जीर्ण जुन्या फाटक्या चिंध्या गुंडाळायचे. सावडण्याच्या विधीतील अस्ताव्यस्त पडलेली फळे त्यांचा घसा ओला करायची. पक्षी बेधडक बाबांच्या पुढयात येवून बसायचे. धिटुकली चिमणी शेपूट हलवत निर्भयतेने गाठोड्यावर नाचायची. विंचू नांगी नाचवायचे. सर्प फणा काढून मिरवायचे. बाबा म्हणजे त्यांचे अभयतेचे आकाश होते.

याच स्मशानातील बांबू, तिरडीचे अवशेष, काथ्या , कडबा घेवून झोपडी उभी केली. काही विकृत जनांनी ती झोपडीही पेटवून दिली. कुणी थट्टा उडवली. कुणी फाटका बारदाना, जर्मलचा ग्लासही पळवला. बाबांनी त्यांचाही उद्धार केला. जे पशु - पक्ष्यांनी, सरपटणाऱ्या विषारी प्राण्याला कळले ते बुद्धीवादी माणसाला का बरे कळले नसेल ? अखेर बाबा माळावर आले. ही भुताटकीची जागा असल्याने तिकडे कोणी दिवसाही फिरकत नसे. शेवटी माणसांपेक्षा भुते बरी अशी माणसेच म्हणू लागली. श्री. म धरती हे अंथरूण व आकाश हे पांघरुन पत्करले. बाबा एकदा माळावर आले ते पुन्हा कुरोली गावात नदी ओलांडून कधीच गेले नाहीत.

श्री. महाराजांचा अन्नत्याग,वस्त्रत्याग ,स्नानत्याग लोकांना आश्चर्यचकीत करू लागला. खुप दूरदूरचे लोक बाबांचा दर्शनास येवू लागले. धनवान ,बुद्धिवान ,उच्चपदस्थ सर्वजन बाबांच्या त्यागाला त्यागाला हिमालय समजून येवू लागले. बाबांनी येणाऱ्या प्रत्येकाला आनंद दिला. चहा प्रसाद दिला. एका किटलीतील चहा कितीही लोक आले. तरी संपत नसे. याचा अनुभव अनेकांनी घेतला आहे.

रंजलेले,गांजलेले दु:खी ,पिडीत ,रोगी बाबांच्या माळावर जावू लागले. आजार,विवाह,नोकरी,संर्पदंश मुवती,अपत्यलाभ यासाठी आलेल्या हजारोंना बाबांच्या चहाप्रसादाचा लाभ झाला. चहा प्रसादाचा चमत्कार,शर्करापुडी प्रसादाचे सामर्थ्य,श्रीफळदान योग यासाठी असंख्य लोक जीवाचा आटापिटा करत. या प्रसादाने बाबांनी पंगूला पळायला लावले,बहरलेली द्राक्षबाग गारांच्या वर्षावापासून वाचवली,कुणाला महाराष्ट्र केसरीची गदा दिली. कुणाला आगीच्या डोंबातून वाचवले. कुणाची पुरात रुतलेली लॉरी सुखरूप बाहेर काढली. दारिद्रयाला धनवान केले, ज्ञानलालसा असणाऱ्या उच्च पदस्थ केले. अनेक व्यसनमुक्त झाले. कित्येक मृत्युच्या जबड्यातून सहीसलामत बाहेर पडले. लाखो भक्तांना कुंभारकीचा माळ म्हणजे यशाचा कुंभ जयाचा कुंभ ठरला.

श्री. म. सतत कार्यरत असत. त्यांनी माळावर शेकडो आश्रम खोल्या उभारल्या. त्यातील कोणत्याच ईमारतीला पाया नाही. मोजपट्टी नाही. फक्त ओली वाळू व विटामध्ये भव्य इमारती उभारल्या. बाबा, कामगार व काम या त्रिसुत्रीला कधीही सुट्टी नव्हती.

पोपट म्हटले की हिरवा तसे माण-खटाव म्हटले की दुष्काळ ! अशा दुष्काळातही बाबांनी शेकडो कुपनलिका माळावर घेतल्या. पाणाडी नाही. पंचाग नाही. बाबा जीथे पाय ठेवत बोअरींग घेतले जाई. सर्वच्या सर्व कुपनलिका भरल्या पाण्याने नांदत आहेत.

माळावर वीजेचे खांब अनेक आहेत. माळावर रात्रीसुद्धा दिवस असल्याचे जाणवते. मात्र आश्रम उभारणे, कुपनलिका घेणे, माळावर पोल उभारणे, वीज ओढणे या बाबांच्या लीला होत्या. माळावर बसून सामाजिक.,सांस्कृतिक,राजकीय,आर्थिक,क्रीडात्मक,अंतद्रेशिय कलात्मक, नैसर्गिक ,भौगोलिक अशा विविध क्षेत्रात माळावरून ते जनहिताचे सुयोग्य बदल घडवत, माळावर बसून जग न्याहाळणारे बाबा महान अवलिया होते.

Yashwant Baba माळावर ' काम आणि घाम ' यांचा ‘ नित्यपाठ ’ असे. ट्रॅक्टर, वाहने, जे. सी. बी. , पोकलॅंड, बोअरवेल मशिन या यांत्रिक आवाजाने समस्त आसमंत हादरून जात असे. काम चालू असताना कामगारांची पळापळ, बघानारांची धावपळ व यंत्रांचे घरघरणारे आवाज हे माळावरील अखंड ‘पारायण’ होते. कुपनलिकेततून प्रचंड वेगाने उसळणारे पाणी, ट्रालीमधून कोसळणारे दगड, माळावर पर्वताप्रमाणे उभे राहणारे वाळूचे ढिग बांधकामातील वीटेची अविट गोडी हा कुंभारकीच्या कुरुक्षेत्रातील महाकर्मयोग ग्रंथाचे ' अध्याय ' होते. वीट, वाळू, दगड, लाकूड, पत्रा, सिमेंट, लोखंड, फावडे, टिकाव, पार यांचा खनखनाट ही बाबांची ' आरती ' होती. शिव्यांच्या भडीमाराला व दगडांच्या माराला घाबरून तासन तास दबा धरून बाबा, बाबा म्हणत बाबांच्या जवळ जाण्याची आस धरणाऱ्या शेकडो भक्तांची ती ' समाधी ' होती. ओल्या वाळूने पकडून ठेवलेल्या विटा व वादळाशी सामना करत उभ्या असलेल्या महाकाय भिंती ही नवलाई आहे. एक - एक वीट रचणे हा कामगारांचा ' नामजप ' होता. बाबांच्या अगाध लीलांचे तोंडभरून कौतुक हेच भक्तांनी भक्तांसाठी केलेले ' प्रवचन ' होते. बाबांचे बोल, बाबांची कृती, बाबांची लीला याची उत्तरे दुसऱ्या दिवशी वर्तमानपत्रात वाचायला मिळत हे बाबांचे ' पंचांग ' होते. आलेल्या भक्ताला तात्काळ मिळालेली अनुभूती मनातील विचारांची प्रचिती हे बाबांच्या कर्मयोगाचे कीर्तन असे. माळावर कामाची धांदल सुरु असताना शिव्यांच्या समवेत ओसंडून वाहीलेली अमृत वाणी हे बाबांचे ‘श्लोक’ होते. त्यांच्या श्री मुखातून बाहेर पडलेल्या शब्दाला कधीही अपयश स्पर्श नाही. हे बाबांचे ' अभंग ' होते. भक्त ते भारताच्या भविष्यात येवू घातलेल्या संकटाच्या स्त्रोताला आपल्या लीलेद्वारे रोखणे हे बाबांचे ' स्तोत्र ' होते. गंगेप्रमाणे निर्मळ, परोपकारी, आदर्श, पवित्र चारित्र्य हे बाबांचे ' चरित्र ' होय. अनंताचा चरितार्थ याच चरित्रातील चांदण्या होत्या. चैतन्याच्या चांदण्याला भूकलेला भक्त ही त्यांची खरी संपत्ती होती. पंचमहाभूतांच्या विळख्यातून, संकटाच्या ग्रहणातून भक्तांना, जीवांना भारतमातेला विविध स्थळी विविध रूपे धारण करून त्यांचे रक्षण करणे हे त्यांचे ' परमहंसत्व ' आहे.

माळावर उभे राहूनच ते जग पाहात . त्यांचे हात जगाच्या कानोकोपऱ्यात फिरत. संकट तारणासाठी ते चिंधीची गाठ मारत. गाठीला गाठ गाठत. त्या गाठींचे गाठोडे झाले. ते गाठोडे भले अवजड होते. ते त्यांच्या कमरेला बांधलेले असे. हत्ती ज्याप्रमाणे सोंड सहज वागवतो तसे बाबा सदैव गोठाड्याचे ओझे सहज वागव. हे गाठोडे म्हणजे लाखो भक्तांची संकटे,देशावरील आपत्ती गाठ्वलेल्या व गोठवलेल्या असत. हे गाठोडे म्हणजे त्यांचे 'ब्रम्हांडनायकत्व 'होते.

श्री.महाराजांनी असंख्य लीला केल्या. त्यासाठी वापरलेली साधने आजही आश्रमात आहेत. स्कायलॅब, राजकीय परिवर्तन,धार्मिक,दंगली शमवणे, मुंबई व गुजरातमधील चक्रीवादळ, कोडगा म्हसोबा, कारगिलच्या शिड्या या लीला अजरामर ठरल्या. पंचमहाभूतावर स्वार होणारे बाबा' ब्रह्यांडनायक' म्हणून ओळखले जाऊ लागले.

श्री महाराजांचे भक्त सातासमुद्रापलीकडे ही आहेत. जर्मनीची तरुण साधिका, इटलीचे व अमेरिकेचे साधक बाबांच्या दर्शनासाठी आले. बाबांना सर्व भाषा अवगत होत्या. योग्यवेळी ते त्याचा वापर करत.

अध्यात्मिक क्षेत्रात आयुष्य संमर्पित केलेले तपस्वी,साधक, गुरु, बाबांच्या दर्शनासाठी येत असत. मौनी महाराज, हसरे महाराज, सदगुरु सरुताई, डेव्हीड महाराज, साळगावकर महाराज, देशमुख महाराज यांना बाबांची प्रचंड ओढ वाटे.

प. पू. श्री. गगनगिरी महाराज व बाबांची भेट म्हणजे राजयोग व कर्मयोगाचा संगम होता. बाबंनी त्यांना श्रीफळ दुध, द्राक्षे भक्तामार्फत त्यांना द्यायला लावले. दोघांत सर्वसाधारण पाचशे फुटाचे अंतर होते. दोघांचा संवाद शब्दाविना झाला. गगनगिरी महाराज उदगारले - 'आम्ही साधक आहोत. बाबा प्रत्यक्ष भगवंत आहेत'.

बाबांनी गंध, माळ, टिळा, अंगारा, दोरा, या साधनांना थारा दिला नाही. पोपटपंची परमार्थ दुरच ठेवला. त्यांचे आदर्श जीवन व पुरुषोत्तम लक्षणे हीच जगाला दिलेली महान देणगी आहे. त्यांच्या प्रत्येक कृतीतील सहजता हाच सहज योग होता. परमात्म्याला जाती-पतीशी काहीही देणे-घेणे नसते हे सिध्दटेक माळावर सिध्द केले. भगवंत प्राप्तीसाठी पदव्या, पांडीत्य यापेक्षा निर्मळ मन महत्त्वाचे हे बिंबवले. रामकृष्ण बुध्द महावीर हे सर्व सम्राटपुत्र होते. सामान्य शेतकऱ्याचा घरात घरात ईश्वर जन्म घेऊ शकतात हेही दाखून दिले. सर्व सिध्दी असूनही आजन्म ते काम करत राहिले. 'काम आहे तर राम आहे' हा मुलमंत्र त्यांनी देऊ केला. आसक्ती मोह, अहंकार, ईर्षा, द्रेष, मत्सर, घृणा, अति महत्वकांक्षा याच्या नशेत असणाऱ्या माणसांपेक्षा दारुच्या नशेतील माणूस परवडला. शुध्द अंत:करणाच्या दारुड्याची नशा उतरू शकते. पण षडरिपूंची नशा घात करते. ही बाबांची स्पष्टोक्ती होती. स्नान नाही. जेवण नाही. वस्त्र नाही. चहाचा घोट आणि सिगारेटचा झुरका एवढ्यावरच त्यांचा देह चाले. त्यागाची महान शिकवण बाबांनी दिली. येणाऱ्या भक्ताच्या मनाचा एक्स-रे काढण्याची अदभूत शक्ती त्यांच्याकडे होती. त्यांनी दु :ख, भोग पचवायला शिकवले. शिव्यांच्या वर्षावाने भक्तांचा क्रोध व अहंकार संपवला. शिव्याने भक्ताचा उत्कर्ष करत. बाबांनी मूर्ती पूजेला स्थान दिले नाही.त्यापेक्षा आंतरिक श्रद्धेला व शारिरीक श्रमाला अधिक स्थान दिले. कोणत्याही कामाचा प्रारंभ मुहूर्त, नारळ फोडणे, उदबत्ती पेटवणे, फुले वाहणे असा कधीच केला नाही. बाबा म्हणत निसर्ग माझा गुरु. सूर्य, चंद्र हे भगवंताने लावलेल्या पंचारत्या आहेत. सुगंद देणारी फुलझाडे देवाने लावलेली उदबत्ती आहे. या बाबांच्या विशालत्वामुले शिक्षक, प्राध्यापक, डॉक्टर्स, न्यायाधिश, अधिकारी, मंत्री, बुद्धिवादी वर्ग बाबांच्या दर्शनास येत. बुद्धी हा परिघ आहे. हृदय या केंद्राशी. बुद्धीजीवी वर्ग बाबांचे निस्सिम भक्त आहेत. साहित्यीक ब्याटीपार्लर मधून ब्युटी होऊन आलेली ब्याटीफुल भाषा ते कधीच वापरत नसत. त्यागाच्या ज्वलंत भट्टीतून लालबुंद, झणझणीत शिव्यांच्या समवेत आलेले बोल बाणासारखे सणसणीत जीवंत माणसाच्या जीवापर्यंत घुसत व शिवापर्यंत घेऊन जात. बाबांची रांगडी भाषा म्हणजे खडकावरचा गाडा. बाबांच्या आश्रमात कागदाला स्थान नव्हते. पण काळजाची खूप काळजी होती. काळजाची काजळी येथे झाडली जाई. ते कर्मयोगाचे पारायण करणारे नारायण होते. त्यांच्या आश्रमाचा पाया कामाचा होता. तर छत घामाचे होते. निर्मल मनाची कवाडे व समतेच्या खिडक्या होत्या. त्यागाचा उंबरठा असल्याने ब्रम्हानंदी वारे सदैव वाहत असे.

आश्रमात कोरा चहा प्रसाद मिळे. कोऱ्या चहा प्रसादाची लिला म्हणजे मन, बुध्दी, श्रध्दा, भक्ती कोरी करकरीत करणे असा होता. कोऱ्या कर्मयोगाची कावड वाहणारा हा कर्मवीर एवढ्यासाठी भक्तांना कोरा करत की - परमात्म्याचे बसण्याचे एकमेव ठिकाण म्हणजे कोरे करकरीत होणे !

सिद्धटेकच्या माळावर रमलेले बाबा म्हणजे जगाचे कुंभार होते. बाबांनी माळावर असंख्ख घडे घडविले. घडा घडविताना ते दोन हातांचा वापर करत. बाहेरचा हात म्हणजे शिव्यांचा व दगडांचा मार होता. आतील हात प्रेम परमेश्वराचा होता. आतून आधार दिला कारण घडा आधीच फुटू नये. व बाहेरून प्रहार केला कारण पुढे कधीही फुटू नये. राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय घड्यांना आकार देणारे सद्गुरु जगदीश्वर कुंभार आहेत. पाण्याविना चिखल नाही आणि घडाही आही. पाणी म्हणजे चारित्र्य संवर्धन. स्त्री काय अन, पुरुष काय दोघांच्याही अंगात मटनच ! बाहुलीच्या सुध्दा डोळ्यात पाहू नये. हे पाणी बाबांनी घडा घडवताना वापरले.

बाबांच्या आश्रमात द्रेष मुक्त व कर्मफळ आकांक्षा विहरीत भक्ताला ते 'संन्याशी’ म्हणत. इंद्रिय तृप्तीचा त्याग करणाऱ्याला ते 'योगी' म्हणत. बाबांच्या माळावर निष्काम कर्मयोग, कर्मसंन्यास योग, ध्यानयोग, त्यागयोग, ज्ञानविज्ञान योग भक्तियोग, पुरुषोत्तमयोग जाणण्याचा व पाहण्याचा योग ज्या भक्तांच्या वाटयाला आला ते धन्य झाले. जागा घडण्यासाठी व घडण्यापूर्वी स्वत:ला घडवण्याचा हेतूत:प्रयत्न म्हणून बाबांचा आश्रम ओळखला जातो. सत्यनारायणापेक्षा शक्यनारायणाला स्थान देणारा आश्रम अशी ख्याती आहे. श्रमगीता आणि विश्रांती गाथा म्हणून बाबांचा आश्रम परिचित आहे.

श्री. महाराजांची अमृतवाणी समस्त भक्तगणांना सदैव प्रेरणा देते. 'जो मजवरी विश्वासला त्याचा कार्यभार मी वाहीला.' 'तुमच्या राज्यात युरोनियमच्या झाडाला बॉंम्बची फळे आलीत, तुमचे रिमोट हवेतून फिरतील. पण आमचा रिमोट कंट्रोल जमीनीतून फिरतो.' 'मी साऱ्या जगाचे पाहतोय तुला वाऱ्यावर कसा सोडेन.'

ॐ परमहंस सदगुरु यशवंत बाबांनी आषाढ शुध्द षष्ठीला रात्री बारा वाजता संजीवन समाधी घेतली. हा सोहळा भक्तगण मोठ्या उत्साहाने साजरा करतात. रात्री बारा वाजता समाधीवर पुष्पवृष्टी होते. अनेक गावातील पायी दिंड्या बाबांच्या माळावर यशवंत हो जयवंत हो च्या जयघोषात टाळ मृदुंगाच्या तालावर नाचत येतात. कुरोली पंढरपूर झाले. अशी अवस्था माळावर असते. वारकऱ्यांना बाबा पांडुरंग वाटतात. पूजनाच्या फोटोतील बाबा सदैव खडे उभे आहेत. चरण सम आहेत, हात सम आहेत, ही पांडुरंगाची लक्षणे त्यांना बाबांच्यात दिसतात. ज्याचा जसा भाव तसे यशवंत देव ही सत्यता आहे.

आज बाबांच्या हेमाडपंथी मंदिराचे भव्य-दिव्य बांधकाम चालू आहे. जे मला एक रुपया देतात. त्यांना मला शंभर रुपये द्यावे लागतात. या बाबांच्या वाणीची अनुभूती घेतलेल्या भक्तांच्या भक्तीचा महापूर आहे. मंदीराचे कळस दर्शन झाल्यावर सदगुरुच्या ऋणातून मुक्त झाल्याचा आनंद त्यांना हवा आहे. गुप्तदान, मासिक दान देवून अजरामर दानत्वाचे पुण्य पदरी घेत आहेत.

बाबांचा देह उघडा, वाणी उघडी, दरवाजे उघडे होते. बाबांच्या नावावर सुईच्या टोकावर बसेल एवढीही संपत्ती नाही. हेही उघड आहे. स्वत:साठी कोणत्याच धनाचा उपयोग केला नाही हे उघड-उघड सत्य आहे. स्नान, वस्त्र, अन्न, निवारा नाही. कडक उन्हात तप्त वाळूवर ते दिवसभर उघडेच पडून रहात हे असंख्ख भक्तांनी उघड्या डोळ्यांनी पाहीले आहे. आश्रम सर्वांसाठी उघडा आहे. श्री. महाराजांचा महामंत्रसुध्दा उघड आहे. यशवंत हो, जयवंत हो ! आपले आत्मज्ञानाचे कवाड उघडो हीच श्रीचरणी याचना घडो.

द्वैताकडून अद्वैताकडे घडणारा प्रवास म्हणजे 'यशवंत हो जयवंत हो '

सरीतेच्या उगमापासून सागराकडे जाणारा प्रवास म्हणजे - 'यशवंत हो जयवंत हो '

साधकाच्या साधनेपासून परमात्म्याकडे होणारा प्रवास म्हणजे. 'यशवंत हो जयवंत हो '

अपयशाला स्पर्श न करणारा व पराजयाला न चिकटणारा मंत्र म्हणजे-'यशवंत हो जयवंत हो '

हातात काम आणि मुखात नाम राहो -

! यशवंत हो, जयवंत हो !