मूळ नाव : देवीदास डेबुजी झिंगराजि जानोरकर
जन्म : २३ फेब्रुवारी १८७६, अँजनगाँव सुरजी, जिला. अमरावती,महाराष्ट्र.
निर्वाण : १९५६
साहित्यरचना : सेवास्वधर्म, भजनावली
कार्य : अंधश्रद्धा निर्मूलन, जातिभेद निर्मूलन
ईश्वर कशात आहे ही नेमकी जाणीव असलेले संत आणि गोरगरीब, दीनदलित यांचा ऐहिक व आध्यात्मिक विकास होण्यासाठी; अज्ञान, अंधश्रद्धा, अस्वच्छता यांचे उच्चाटन करण्यासाठी तळमळीने कार्य करणारे होते.
गाडगे महाराजांचे चिंध्याची गोधडी हे महावस्त्र होते. ते तुटक्या पादत्राणांचे विजोड जोडपायी वापरत. डोईवर फुटके मडके असे. भोजनाच्या वेळी थाळी म्हणून आणि भोजनानंतर शिरस्त्राणे म्हणून त्याचा वापर होत असे. त्यांनी कशाचा संग्रह केला नाही, कशाची हाव बाळगली नाही.
बाबांनी धर्मशाळा, घाट, अन्नछत्रे आणि सदावर्त बांधली. फिरते दवाखाने सुरु केले. बाबा स्वतः निरक्षर होते पण समाजसुधारक आणि शिक्षण प्रसारक होते. ‘सद्गुरु गाडगे महाराज कॉलेज’ काढून कर्मवीर भाऊराव पाटील यांनी त्यांच्या ऋणविमोचनाचा अल्पसा प्रयत्न केला.
मूळ नाव : माणिक बंडोजी इंगळे
जन्म : एप्रिल 30, १९०९ यावली, जि. अमरावती
निर्वाण : ऑक्टोबर ३१, १९६८
साहित्यरचना : ग्रामगीता, अनुभव सागर भजनावली, सेवास्वधर्म, राष्ट्रीय भजनावली
कार्य : अंधश्रद्धा निर्मूलन, जातिभेद निर्मूलन
तुकडोजी महाराज यांना राष्ट्रसंत म्हणून ओळखले जाते. अंधश्रद्धा निर्मूलन व जातिभेदाच्या निर्मूलनासाठी त्यांनी भजनांचा आणि कीर्तनाचा प्रभावीपणे वापर केला. आत्मसंयमनाचे विचार त्यांनी ग्रामगीता या काव्यातून मांडले. त्यांनी मराठी व हिंदी भाषांमध्ये काव्यरचना केली आहे. तुकडोजी महाराजांनी १९३५ साली मोझरी येथे गुरुकुंज आश्रमाची स्थापना केली. खंजिरी भजन हा प्रकार त्यांच्या प्रबोधनाचे वैशिष्ट्य होते.
तुकडोजी महाराज हे आधुनिक काळातील महान संत होते. आडकोजी महाराज हे त्यांचे गुरू. विदर्भात त्यांचा विशेष संचार असला तरी महाराष्ट्राभरच नव्हे तर देशभर हिंडून ते आध्यात्मिक, सामाजिक व राष्ट्रीय एकात्मतेचे प्रबोधन करीत होते. एवढेच नव्हे तर जपानसारख्या देशात जाऊन त्यांनी सर्वांना विश्वबंधुत्वाचा संदेश दिला. सन १९४२ च्या भारत छोडो आंदोलनादरम्यान काही काळ त्यांना अटक झाली होती. "आते है नाथ हमारे" हे त्यांनी रचलेले पद या काळात स्वातंत्र्यलढ्यासाठी स्फूर्तिगान ठरले होते.